SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'या' गोष्टीमुळे भारताचा कर्णधार नाही बनू शकला ऋषभ पंत, आर अश्विनचं मोठं वक्तव्य

R Ashwin About Rishabh Pant : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टेस्ट सामन्यात ऋषभ पंत वेगवान गोलंदाज जेकब डफीविरुद्ध मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. खराब शॉट सिलेक्शनमुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. यातच आर अश्विनने पंतबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 28, 2026, 21:54 IST | Updated: Nov 28, 2026, 22:48 IST
Image Credit: 'या' गोष्टीमुळे भारताचा कर्णधार नाही बनू शकला ऋषभ पंत, आर अश्विनचं मोठं वक्तव्य
Join

R Ashwin About Rishabh Pant : भारतीय टेस्ट क्रिकेटमध्ये ऋषभ पंत आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र क्राइस्टचर्चमध्ये त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीमुळे पुन्हा एकदा वादविवाद निर्माण केला आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील 356 धावांच्या प्रत्युत्तरात, जेव्हा भारतीय संघाला एका मोठ्या भागीदारीची अत्यंत गरज होती, तेव्हा 23 धावांवर फलंदाजी करत असलेला ऋषभ पंत वेगवान गोलंदाज जेकब डफीविरुद्ध मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात क्रीज बाहेर आला आणि कॅच आउट झाला. पंत बाद झाल्यावर भारताच्या फलंदाजीची घसरण होण्यास सुरुवात झाली. आता भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने पंतच्या शॉट्सच्या निवडीवर आणि त्याच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ऋषभ पंतवर भडकला आर अश्विन :

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आर अश्विनने स्पष्ट शब्दात सांगितलं की ऋषभ पंतने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे त्याने फक्त संघाचं नाही तर स्वतःच्या करिअरचं सुद्धा नुकसान केलं आहे. आर अश्विनने म्हटलं की, 'पंतकडे आपल्या पिढीतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक बनण्याची क्षमता आहे. मात्र जर त्याने आपल्या खेळात सुधारणा केली असती आणि अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेतले असते, तर तो भारतासाठी चौथ्या क्रमांकावर नियमित खेळाडू बनू शकला असता. इतकेच नव्हे, तर तो देशाचे नेतृत्वही करू शकला असता. त्याच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेनेच त्याला दगा दिला आहे आणि मला नेमके हेच सांगायचे आहे'.

आर अश्विनने म्हंटलं की ऋषभ पंत हा नेहमी एकाच प्रकारे आउट होत असतो. तो क्रीजच्या पुढे येऊन फिल्डच्या वरून शॉट मारण्याचा प्रयत्न करतो आणि ठीक त्याच ठिकाणी कॅच देतो जिथे फिल्डर तैनात असतो. त्याने गेल्या काही वर्षांतील अशा काही प्रसंगांचाही उल्लेख केला जेव्हा पंत इंग्लंडविरुद्ध अगदी अशाच प्रकारे बाद झाला होता.

हेही वाचा : 'मी तयार नव्हतो.... अंबानी सोबत बोलणं झालं', मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यावर रोहित शर्माचा खुलासा

अश्विनने पंतची तुलना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज विकेटकिपर फलंदाज ॲडम गिलख्रिस्टशी करण्यावरही भाष्य केले आणि चाहत्यांना केवळ मनोरंजनावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सामन्याच्या निकालांवर लक्ष देण्याचे आवाहन केले. अश्विन म्हणाला, 'जेव्हा मी त्याच्या टेस्ट शतकांकडे आणि त्या सामन्यांच्या निकालांकडे पाहिले, तेव्हा विजयांची संख्या कमी होती. त्या वेळेपर्यंत त्याच्या शतकांपैकी केवळ एका शतकामुळे संघाला विजय मिळाला होता. जर आपण गाबा मैदानावर त्याने खेळलेली 89 धावांची खेळी केली ज्यात संघाचा विजय झाला होता. ती यात समाविष्ट केली, तर कदाचित अशा दोन किंवा तीन प्रसंगांचा उल्लेख करता येईल'. अश्विनने पुढे असेही नमूद केले की, 90 च्या घरात बाद होणे म्हणजे नेहमीच 'निस्वार्थीपणा' असतो असे नाही. कधीकधी हे केवळ निष्काळजीपणामुळे किंवा विचार न करता खेळल्यामुळे घडते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES