जानेवारीमध्ये IPL खेळवण्याची मागणी, KKR ची मालकीण जुही चावलाने केली पोस्ट
IPL 2027 : आयपीएल ही स्पर्धा आता जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 लीगपैकी एक आहे. मात्र दरवर्षी मार्च ते मे दरम्यान होणारी ही स्पर्धा ही जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात यावी अशी मागणी कोलकाता नाईट रायडर्सची सहमालकीण जुही चावला हिने केली आहे.
IPL 2027 : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत लीगपैकी एक आहे. दरवर्षी ही स्पर्धा मार्च ते मे या दरम्यान खेळवली जाते. मात्र आयपीएलच्या आयोजनात बदल करण्याची मागणी केली जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सची सहमालकीण जुही चावला हिने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपले विचार मांडले आहेत. जुहीने आयपीएलचं नियोजन हे जानेवारी महिन्यात करण्यात यावं अशी मागणी केली आहे. तिचं म्हणणं आहे की स्पर्धेच्या शेड्युलमध्ये केलेल्या बदलांचा परिणाम हा खेळाडू, प्रेक्षक आणि यांच्याशी जोडलेल्या लोकांना सुद्धा होईल. सध्या मार्च ते मे महिन्यात या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि याचे अधिकतर सामने हे एप्रिल आणि मे महिन्यात खेळल्या जातात.
जुही चावलाचं मत काय?
जुही चावला ही कोलकाता नाईट रायडर्सची सहमालकीण आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आयपीएलच्या सध्याच्या शेड्युलवर प्रश्न उपस्थित केले. त्याने लिहिले की आयपीएलला आता क्रिकेट कॅलेंडरमध्ये आपलं स्थान बनवण्याची गरज नाही. आयपीएलने आता एवढं मोठं स्थान बनवलं आहे की ही स्पर्धा क्रिकेट कॅलेंडरला प्रभावित करण्याचा अधिकार ठेवते.
यापूर्वी ललित मोदीने सुद्धा स्पर्धेचा विकास, खेळाडूंसाठी चांगली परिस्थिती आणि प्रसारण मिळण्याचा फायदा लक्षात घेऊन जानेवारीमध्ये आयपीएलचं आयोजन करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी असेही नमूद केले की एप्रिल आणि मे महिन्यात भारतात जाणवणारा उष्णतेचा त्रास खेळाडू आणि प्रेक्षक दोघांसाठीही अडचणी निर्माण करतो. त्यामुळे ही स्पर्धा आधीच्या कालावधीत आयोजित केल्यास अधिक चांगला अनुभव मिळू शकेल आणि प्रसारणाच्या दृष्टीनेही नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील.
काय म्हणाली जुही चावला?
जुहीने एक्सवर पोस्ट करून लिहिलं की, 'अधिक चांगल्या परिस्थिती. अधिक चांगला क्रिकेट खेळ. सर्वांसाठीच एकंदरीत अधिक चांगला अनुभव! आयपीएलमध्ये उत्क्रांती झाली आहे. कदाचित आता त्याच्या वेळापत्रकातही बदल करण्याची वेळ आली आहे! यासंदर्भात बीसीसीआय काय विचार करत आहे आणि आगामी हंगामात काही बदल केले जातील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल'.
आयपीएल 2027 साठी मिनी ऑक्शन :
आयपीएल 2027 साठी डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शनचं आयोजन केलं जाणार आहे. यंदा खूप वर्षांनी भारतात याचं आयोजन करण्यात येणार असून गोवा हे ठिकाण यासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे. तर सर्व आयपीएल संघांना 17 नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्याचे सांगण्यात आलं आहे.