Kumar Kushagra Replace Rishabh Pant In India A : टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीनंतर झारखंडमधून अनेक क्रिकेटर पुढे आले ज्यापैकी अनेकांची इच्छा विकेटकीपर बॅटर बनण्याची होती. कुमार कुशाग्रा हा त्यापैकीच एक आहे. लांब लचक सिक्सर मारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या 21 वर्षीय खेळाडूने आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी 'इंडिया ए' संघात स्थान मिळवले आहे. दुखापतग्रस्त ऋषभ पंतच्या जागी तो पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात सामील होईल आणि यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल व वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या अनुभवी खेळाडूंसोबत संघात खेळणार आहे.
ऑक्शनमध्ये लागली 7 कोटींची बोली :
आयपीएल 2024 च्या मेगा ऑक्शनमध्ये पहिल्यांदाच सामील झालेल्या कुमार कुशाग्रवर पैशांचा पाऊस पडला होता. 19 वर्षांचा एक तरुण एका रात्रीत करोडपती बनला. लिलावादरम्यान या विकेटकिपर फलंदाजाला आपल्या संघात घेण्यासाठी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जोरदार चुरस रंगली होती. दिल्ली कॅपिटल्सने त्याला तब्बल 7.2 कोटी रुपयांना विकत घेतले. ही रक्कम त्याच्या 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीच्या 36 पट अधिक होती. मात्र आयपीएल 2024 नंतर आगामी सीजनपूर्वी दिल्लीने त्याला रिलीज केलं. पुढील सीजनपूर्वी दिल्लीने त्याला मुक्त केल्यानंतर, गुजरात टायटन्सने त्याला 65 लाख रुपयांना विकत घेतले. आयपीएल 2026 साठी त्याला त्याच किंमतीत कायम ठेवण्यात आले. कुमार कुशाग्रा मोठे सिक्स मारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
कुमार कुशाग्रची कौटुंबिक पार्श्वभूमी :
कुमार कुशाग्रचे वडील जमशेदपूरमध्ये जीएसटी आयुक्त आहेत तर आई गृहिणी आहे. त्याला दोन धाकट्या बहिणी आहेत. कुशाग्र अभ्यासात अत्यंत हुशार होता. माध्यमिक शिक्षणापर्यंत त्याने सातत्याने उत्कृष्ट गुण मिळवले, परंतु वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी झारखंडच्या अंडर 16 संघात निवड झाली आणि त्यानंतर त्याने आपले संपूर्ण लक्ष केवळ क्रिकेटवर केंद्रित केले.
ऋषभ पंत का पडला बाहेर?
इराणी कपमध्ये रेस्ट ऑफ इंडियाच्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या पंतला मसल स्ट्रेनचा सामना करावा लागला आहे. ही दुखापत सुरुवातीला वाटली होती त्यापेक्षा अधिक गंभीर असल्याचे दिसून येत आहे. या दौऱ्यासाठी ऋषभची उपलब्धता त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून होती. बीसीसीआयने सांगितले की तो मंडळाच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून त्याची तब्येत सुधारत आहे. तिसऱ्या सामन्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबतचा निर्णय नंतर घेतला जाईल.
इंडिया ए चा संघ :
यशस्वी जयस्वाल, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन स्मरण, ध्रुव जुरेल (कर्णधार), वाशिंगटन सुंदर, आकिब नबी, आकाश दीप, अंशुल कंबोज, मानव सुथार, मुकेश चौधरी, साई सुदर्शन, यश राठौड़, मुकेश कुमार आणि कुमार कुशाग्र (सुरुवातीचे दोन सामने)