Mumbai Indians : आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सने त्यांचा माजी कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करून पंजाब किंग्सकडे पाठवलं तर पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंह याला ट्रेड करून मुंबईने आपल्या संघात घेतलं. मात्र एका रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्सला हार्दिकच्या बदल्यात राजस्थान रॉयल्समधील यशस्वी जयस्वाल आणि रवी बिष्णोई यांना ट्रेड करून आपल्या संघात घ्यायचं होतं. मात्र मुंबईचा नवा हेड कोच कायरन पोलार्डच्या सल्ल्यानंतर फ्रेंचायझीची प्राथमिकता बदलली आणि त्यानंतर मुंबईला फलंदाज आणि स्पिनर शिवाय एक मजबूत भारतीय वेगवान गोलंदाजाची आवश्यकता असल्याचं वाटलं.
हार्दिक पांड्याच्या ट्रेडमध्ये पोलार्डने बदलला गेम :
अहवालात नमूद केल्यानुसार, हार्दिक पांड्याबाबतच्या सुरुवातीच्या चर्चेत मुंबई इंडियन्सची योजना एक फलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज मिळवण्याची होती. या संदर्भात यशस्वी जयस्वाल आणि रवी बिश्नोई यांच्याबाबत राजस्थान रॉयल्सशीही चर्चा झाली होती. राजस्थानच्या व्यवस्थापनाने या प्रस्तावावर गांभीर्याने विचारही केला होता.
दावा करण्यात आला आहे की फ्रेंचायझीची सोशल मीडिया टीम हार्दिक पांड्या सोबत शूटसाठी बंगळुरूमध्ये गेली होती. मात्र या प्रवासाबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे. काही अहवालांनुसार, राजस्थानचे प्रशिक्षक कुमार संगकारा देखील बेंगळुरूला गेले होते. तसेच, संघातील इतर सदस्य तिथे कर्णधार रियान परागची भेट घेण्यासाठी आणि युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीसोबत एका शूटमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्याचेही सांगण्यात आले.
कायरन पोलार्डचं टार्गेट होतं वेगवान गोलंदाज :
हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत बातचीत सुरु असताना मुंबई इंडियन्सने आपल्या रणनीतीत बदल केला. सांगितलं जातंय की कायरन पोलार्डने संघासाठी एका वेगवान गोलंदाजाची आवश्यकता आहे असं सांगितलं. यानंतर मुंबईने एका भारतीय वेगवान गोलंदाजासाठी विविध फ्रँचायझींशी शक्यता पडताळून पाहायला सुरुवात केली. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सकडे हर्षित राणाबद्दल चौकशी केली आणि जोफ्रा आर्चरच्या बाबतीत राजस्थान रॉयल्सशी संपर्क साधण्याचाही विचार केला. अखेरीस मुंबईने अर्शदीप सिंगसाठी पंजाब किंग्ससोबत करार केला.
मुंबई अजूनही जयस्वालला घेण्यासाठी उत्सुक :
अर्शदीप संघात सामील झाला असला, तरी मुंबई इंडियन्सचा यशस्वी जैस्वालमधील रस पूर्णपणे संपला आहे असे म्हणता येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अजूनही जैस्वालसाठी थेट रोख रकमेचा व्यवहार करण्याचा विचार करू शकते. तो संघासाठी दीर्घकालीन एक भक्कम सलामीचा पर्याय ठरू शकतो आणि आगामी अनेक लिलावांमध्ये तो फ्रँचायझीच्या योजनांचा भाग राहू शकतो.