Sachin Tendulkar Batography Inaugaration : मास्टरब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर याला 16 नोव्हेंबर 2026 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्याला 13 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशन एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात भारतरत्न सचिन तेंडुलकरला समर्पित असलेल्या 'बॅटोग्राफी' या अनोख्या दालनाचे अनावरण करण्यात आले. या दालनात सचिन तेंडुलकर याच्या पहिल्या बॅटपासून ते अखेरच्या टेस्टपर्यंत वापरलेल्या काही खास 26 बॅटचं कलेक्शन आहे. यासोबतच काही निवडक हेडगियर आणि पोशाख सुद्धा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे.
'माझ्या शरीराचा भाग काढून देतोय...' :
भारतरत्न सचिन तेंडुलकरला समर्पित असलेल्या 'बॅटोग्राफी' या अनोख्या दालनाचे अनावरण एमसीए म्यूजियममध्ये करण्यात आले. या ठिकाणी तयार केलेल्या दालनात सचिन तेंडुलकरच्या पहिल्या बॅटपासून ते त्याच्या शेवटच्या टेस्ट सामन्याच्या बॅटपर्यंत अशा 26 बॅटच कलेक्शन येथे ठेण्यात आले आहे. या दालनातील प्रत्येक बॅट ही तेंडुलकर यांच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील एका महत्त्वपूर्ण पर्वाचे प्रतिनिधित्व करते. या संग्रहाची सुरुवात 1978 मध्ये, वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची मोठी बहीण सविता यांनी भेट दिलेल्या काश्मीर विलोच्या बॅटपासून होते. या संग्रहातील काही अत्यंत महत्त्वाच्या बॅट्समध्ये 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी मँचेस्टर येथे पहिले टेस्ट शतक झळकावण्यासाठी वापरलेली बॅट, 1998 मध्ये सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी भेट दिलेली बॅट; 2003 च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत वापरलेली आणि ज्या कामगिरीसाठी त्यांना प्लेअर ऑफ द पुरस्काराने गौरविण्यात आले ती बॅट. तसेच 16 मार्च 2012 रोजी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100वे शतक झळकावण्यासाठी वापरलेली बॅट यांचा समावेश आहे.
बॅट्सच्या या संग्रहाला तेंडुलकर यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण क्षणांची आठवण करून देणाऱ्या विविध स्मृतिचिन्हांची जोड देण्यात आली आहे. यामध्ये त्यांचे पहिले हेल्मेट, मुंबई रणजी करंडक संघाची जर्सी, त्यांच्या 200व्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाची जर्सी आणि हेल्मेट, तसेच वानखेडेवर झालेल्या निरोपाच्या भाषणादरम्यान त्यांनी संदर्भासाठी वापरलेले कागदी पान यांचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकरने यावेळी मुंबई क्रिकेर असोसिएशनचे आभार मानले तसेच तो म्हणाला की, 'खेळाडूच्या आयुष्यात त्याचे खेळाचे साहित्य म्हणजे त्याच्या शरीराचा जणू एक भागच असतो. हे साहित्य अनेक वर्षांपासून मी जपून ठेवली आहेत. ही साहित्य म्हणजे माझ्या शरीराचा जणू भागच आहेत तेव्हा यानिमित्ताने एमसीए म्यूजियमला मी माझ्या शरीराचा भाग काढून तुम्हाला देतोय तेव्हा कृपया त्याची नीट काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे. दिलेल्या संधीबद्दल एमसीएचे खूप खूप धन्यवाद'. एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 'वानखेडे स्टेडियमच गवत' सचिनला भेट म्हणून दिलं.