SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'माझ्या शरीराचा भाग काढून देतोय...', पहिल्या बॅटपासून ते अखेरच्या टेस्टपर्यंत, MCA म्यूजियममध्ये सचिन तेंडुलकरच्या बॅटोग्राफी दालनाचे अनावरण

Sachin Tendulkar Batography Inaugaration : मुंबई क्रिकेट असोसिएशन एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात भारतरत्न सचिन तेंडुलकरला समर्पित असलेल्या ‘बॅटोग्राफी’ या अनोख्या दालनाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना सचिन म्हणाला की 'हे साहित्य माझ्या शरीराचा जणू भागचं आहेत'.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 17, 2026, 06:39 IST | Updated: Nov 17, 2026, 07:23 IST
Image Credit: MCA म्यूजियममध्ये सचिन तेंडुलकरच्या बॅटोग्राफी दालनाचे अनावरण
Join

Sachin Tendulkar Batography Inaugaration : मास्टरब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर याला 16 नोव्हेंबर 2026 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्याला 13 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशन एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात भारतरत्न सचिन तेंडुलकरला समर्पित असलेल्या 'बॅटोग्राफी' या अनोख्या दालनाचे अनावरण करण्यात आले. या दालनात सचिन तेंडुलकर याच्या पहिल्या बॅटपासून ते अखेरच्या टेस्टपर्यंत वापरलेल्या काही खास 26 बॅटचं कलेक्शन आहे. यासोबतच काही निवडक हेडगियर आणि पोशाख सुद्धा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे.

'माझ्या शरीराचा भाग काढून देतोय...' :

भारतरत्न सचिन तेंडुलकरला समर्पित असलेल्या 'बॅटोग्राफी' या अनोख्या दालनाचे अनावरण एमसीए म्यूजियममध्ये करण्यात आले. या ठिकाणी तयार केलेल्या दालनात सचिन तेंडुलकरच्या पहिल्या बॅटपासून ते त्याच्या शेवटच्या टेस्ट सामन्याच्या बॅटपर्यंत अशा 26 बॅटच कलेक्शन येथे ठेण्यात आले आहे.  या दालनातील प्रत्येक बॅट ही तेंडुलकर यांच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील एका महत्त्वपूर्ण पर्वाचे प्रतिनिधित्व करते. या संग्रहाची सुरुवात 1978 मध्ये, वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची मोठी बहीण सविता यांनी भेट दिलेल्या काश्मीर विलोच्या बॅटपासून होते. या संग्रहातील काही अत्यंत महत्त्वाच्या बॅट्समध्ये 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी मँचेस्टर येथे पहिले टेस्ट शतक झळकावण्यासाठी वापरलेली बॅट, 1998 मध्ये सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी भेट दिलेली बॅट; 2003 च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत वापरलेली आणि ज्या कामगिरीसाठी त्यांना प्लेअर ऑफ द पुरस्काराने गौरविण्यात आले ती बॅट. तसेच 16 मार्च 2012 रोजी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100वे शतक झळकावण्यासाठी वापरलेली बॅट यांचा समावेश आहे.

हेही वाचा : न्यूझीलंड विरुद्ध सीरिज संपली, आता पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत कधी दिसणार रोहित - विराट? पाहा आगामी वनडे सीरिजचं शेड्युल

बॅट्सच्या या संग्रहाला तेंडुलकर यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण क्षणांची आठवण करून देणाऱ्या विविध स्मृतिचिन्हांची जोड देण्यात आली आहे. यामध्ये त्यांचे पहिले हेल्मेट, मुंबई रणजी करंडक संघाची जर्सी, त्यांच्या 200व्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाची जर्सी आणि हेल्मेट, तसेच वानखेडेवर झालेल्या निरोपाच्या भाषणादरम्यान त्यांनी संदर्भासाठी वापरलेले कागदी पान यांचा समावेश आहे.

सचिन तेंडुलकरने यावेळी मुंबई क्रिकेर असोसिएशनचे आभार मानले तसेच तो म्हणाला की, 'खेळाडूच्या आयुष्यात त्याचे खेळाचे साहित्य म्हणजे त्याच्या शरीराचा जणू एक भागच असतो. हे साहित्य अनेक वर्षांपासून मी जपून ठेवली आहेत. ही साहित्य म्हणजे माझ्या शरीराचा जणू भागच आहेत तेव्हा यानिमित्ताने एमसीए म्यूजियमला मी माझ्या शरीराचा भाग काढून तुम्हाला देतोय तेव्हा कृपया त्याची नीट काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे. दिलेल्या संधीबद्दल एमसीएचे खूप खूप धन्यवाद'. एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 'वानखेडे स्टेडियमच गवत' सचिनला भेट म्हणून दिलं. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES