IPL 2027 च्या ऑक्शनपूर्वी रिलीज होणार 10 स्टार फलंदाज? नावं वाचून शॉक व्हाल
IPL 2027 Auction : IPL 2027 च्या ऑक्शनपूर्वी सर्व फ्रेंचायझींकडून रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीपासून ऑक्शनपूर्वी संघ कोणत्या खेळाडूंना रिलीज करू शकतात यांची नावं सध्या क्रीडा विश्वात चर्चेत आहेत.
IPL 2027 Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या 20 व्या सीजनसाठी येत्या डिसेंबर महिन्यात ऑक्शन पार पडणार आहे. त्यापूर्वी 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी द्यायला सांगितली आहे. यंदा 10 स्टार खेळाडूंची नाव समोर येत आहेत, ज्यांना त्यांचे संघ ऑक्शनपूर्वी रिलीज करू शकतात. यात सूर्यकुमार यादव सह एडन मार्करम सारख्या दिग्गज खेळाडूंच्या नावांचा सुद्धा समावेश आहे.
सूर्यकुमार यादव :
मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवचं नाव सुद्धा या लिस्टमध्ये सामील आहे. सूर्यकुमार यादवचा परफॉर्मन्स मागील काही सीजन पासून चांगला राहिलेला नाहीये. आता तो भारताच्या टी20 संघाचा भाग सुद्धा नाहीये. अशातच मुंबई इंडियन्स त्याला रिलीज करू शकते.
पृथ्वी शॉ :
दिल्ली कॅपिटल्समधून पृथ्वी शॉला रिलीज करण्यात येऊ शकतं. कारण त्याला मागच्या सीजनला खेळण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती. फ्रेंचायझी त्याला बाहेर करू शकते.
जॅकब बेथेल :
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सध्याचा चॅम्पियन संघ आहे. त्यामुळे ते यंदा खूप कमी खेळाडूंना रिलीज करतील. इंग्लंडचा उदयोन्मुख खेळाडू जेकब बेथेल या शर्यतीत असू शकतो. बेथेलला आरसीबीसाठी विशेष प्रभाव पाडता आलेला नाही आणि आता तो ऑक्शनचा भाग बनू शकतो.
राहुल तेवतीया :
गुजरात टायटन्ससाठी मागील काही काळापासून राहुल तेवतियाने प्रभावी खेळी केलेली नाही. यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स ठोकले होते. त्यानंतर तो गुजरात संघात सामील झाला मात्र गेल्या दोन सीजन पासून त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. परिणामी, आता त्याला संघातून बाहेर करण्यात आले आहे.
सरफराज खान :
भारताचा टेस्ट फलंदाज सरफराज खान गेल्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. सरफराजला अनेक संधी मिळाल्या, पण त्याला त्यांचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. त्यामुळे त्याला ऑक्शनपूर्वो चेन्नई त्याला संघातून मुक्त करू शकते.
एडन मार्करम :
दक्षिण आफ्रिकेचा टी20 कर्णधार एडन मार्करम लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळतो. मात्र यावेळी लखनऊचा संघ त्याला रिलीज करण्याची शक्यता आहे.
अजिंक्य रहाणे :
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ कर्णधार अजिंक्य रहाणेला रिलीज करण्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणे कर्णधार असण्यासोबत त्याच्या फलंदाजीने कमाल दाखवू शकला नाही. त्याने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
शिमरन हेटमायर :
वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज शिमरन हेटमायर राजस्थान रॉयल्समध्ये मागच्या वर्षी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे कदाचित फ्रेंचायझी त्याला आगामी सीजनपूर्वी रिलीज करू शकते.
शरफेन रदरफोर्ड :
शेरफेन रदरफोर्ड ट्रेड डीलद्वारे मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता. मात्र फ्रेंचायझीला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्याची कामगिरी फारशी प्रभावी ठरली नाही. पत्यामुळे शरफेन रदरफोर्ड याला संघातून रिलीज केलं जाऊ शकतं.
अब्दुल समद :
लखनऊ सुपर जायंट्सने विस्फोटक फलंदाज अब्दुल समदला संधी दिली होती. मात्र अब्दुल समदने अपेक्षेनुसार चांगली कामगिरी न केल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.