फायनलमधील विजयानंतर भारतीय खेळाडूंचं भन्नाट सेलिब्रेशन, पाहून पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या
U19 Asia Cup 2026 Final : पुरुष अंडर 19 आशिया कप 2026 फायनल सामन्यात भारताच्या रोमांचक विजयानंतर मैदानात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विजयानंतर भारतीय खेळाडू हे थेट पाकिस्तानच्या डगआउटजवळ जाऊन आक्रमकपणे सेलिब्रेशन करताना दिसले.
U19 Asia Cup 2026 Final : एसीसी पुरुष अंडर 19 आशिया कप 2026 ही स्पर्धा ओमान येथे खेळवण्यात आली. यात शनिवारी फायनल सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झाला. जेव्हा जेव्हा हे दोन पारंपरिक विरोधी देशांचे संघ क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर येतात तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष हे त्या सामन्याकडे लागलेलं असतं. शनिवारी झालेला पुरुष अंडर 19 आशिया कप फायनलमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचून आणला आणि आशिया कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. मात्र या रोमांचक विजयानंतर मैदानात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर चौकार ठोकल्यावर भारतीय खेळाडू हे थेट पाकिस्तानच्या डगआउटजवळ जाऊन आक्रमकपणे सेलिब्रेशन करत होते. सध्या याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पुरुष अंडर 19 आशिया कप स्पर्धेत शनिवारी भारतीय संघाने पाकिस्तानला 1 विकेटने मात देऊन सामना जिंकला. पाकिस्तानने विजयासाठी 338 धावांचं मोठं लक्ष दिलं होतं. भारतीय संघाने सामन्याच्या अगदी शेवटच्या बॉलवर विजय मिळवला, तोपर्यंत त्यांचे 9 विकेट बाद झाले होते. मात्र या संस्मरणीय विजयानंतर लगेचच मैदानावर मोठा तणाव निर्माण झाला. शेवटच्या बॉलवर चौकार मारल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघ आणि त्यांच्या खेळाडूंसमोर अत्यंत आक्रमक आणि उत्साही पद्धतीने जल्लोष केला, ज्यामुळे काही काळासाठी मैदानातील वातावरण तणावपूर्ण बनले.
मैदानावर भारतीय खेळाडूंच्या या आक्रमक सेलिब्रशनची तीव्रता पाहून दोन्ही संघातील तणाव वाढत होता. त्यानंतर स्थिती सांभाळण्यासाठी सपोर्ट स्टाफला मध्ये यावं लागलं. सपोर्ट स्टाफने पुढे येऊन खेळाडूंना शांत केलं आणि प्रकरण अधिक चिघळण्यापासून थांबावलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कनिष्ठ व वरिष्ठ स्तरावरील अलीकडील सामन्यांमध्ये दिसून आलेल्या प्रमाणेच या अंतिम सामन्यानंतरही दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही.
पाकिस्तानची प्लेईंग 11: उस्मान खान, हायम खान, अब्दुल कादिर, फरहान युसुफ (कर्णधार), अहमद हुसेन, अली रझा, हमजा जहूर (विकेटकिपर), हसनैन अब्बास दार, मोहम्मद सय्यम, रिझवानुल्ला, निकाब शफीक
भारताची प्लेईंग 11 : लक्ष्य राजेश रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्हीके विनीत, यशवर्धन चौहान, अर्जुन राजपूत, अन्वय द्रविड (विकेटकिपर), मनाल चौहान, मोहित उलवा, आर्यन सवसानी, काव्या पटेल, चिगुरुपती व्यंकट