शेअर्स खरेदी करणं आता अगदी सोपं झालं आहे. म्हणजे ऑनलाइन माध्यमातून खास करुन अॅपवरुन शेअर्सची खरेदी-विक्री अगदी सहज करता येते. त्यामुळे शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी शेअर्स खरेदी आणि विक्रीचे निर्णय हे अगदी प्रथमदर्शनी अल्प नफ्या तोट्यावरही घतले जातात. पण खरंच शेअर स्वस्त झाल्यावर खरेदी केल्यास जास्त नफा होतो का? तोटा होण्याची शक्यता किती असते? याची कल्पना अनेकांना नसते. त्याचबद्दल आपण इथे काही महत्त्वाच्या घटकांबद्दल बोलणार आहोत.
समजा, एखाद्या गुंतवणूकदाराने एका कंपनीचे 10 शेअर्स प्रत्येकी 150 रुपयांना घेतले. त्यानंतर शेअरची किंमत घसरून 100 रुपये झाली. अशा वेळी गुंतवणूकदाराकडे तीन पर्याय असू शकतात. तोटा स्वीकारून शेअर्स विकणे, शेअरच्या किमतीत सुधारणा होण्याची वाट पाहणे किंवा आणखी शेअर्स खरेदी करणे. जर त्याने 100 रुपयांना आणखी शेअर्स घेतले, तर त्याची सरासरी खरेदी किंमत कमी होईल. त्यामुळे मूळ खरेदी किंमतीपर्यंत पोहोचण्यासाठी शेअरला आधीपेक्षा कमी वाढ करावी लागेल.
पहिली खरेदी करताना शेअर्सची किंमत 10 रुपये असेल आणि तुम्ही 80 शेअर्स खरेदी केले. दुसऱ्या खरेदीमध्ये हेच 10 शेअर्स तुम्ही 100 रुपयांना खरेदी केले तर तुमच्या 20 शेअर्सची एकूण किंमत 180 रुपये म्हणजेच सरासरी 9 रुपयाला एक शेअर अशी होईल.
शेअर घसरला असं सामान्यपणे म्हटलं जात असलं तरी तो कसा घसरला यालाही गुंतवणुकीचा विचार केल्यास फार महत्त्व आहे. शेअरची किंमत बाजारातील तात्पुरत्या घसरणीमुळे कमी झाली आहे की कंपनीच्या व्यवसायातच अडचणी निर्माण झाल्या आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच कंपनीची आर्थिक कामगिरी आणि व्यवसायाची मूलभूत स्थिती मजबूत असेल आणि घसरण तात्पुरती असेल, तर कमी किमतीत अतिरिक्त शेअर्स खरेदी करण्याचा विचार केला जाऊ शकतो. पण कंपनी किंवा संबंधित उद्योगाच्या मूलभूत स्थितीतच कमजोरी आली असेल, तर सतत खरेदी केल्याने तोटा वाढू शकतो. तसे होऊ द्यायचे नसेल तर तुम्हाला त्यावर लक्ष द्यावे लागेल. म्हणजे फक्त शेअर्स पडले असं म्हणून चालणार नाही तर कंपनीचा पूर्ण अभ्यास असणंही अधिक फायद्याचं आणि कमी जोखमीचं ठरतं.
एका कंपनीत जास्त पैसा अडकण्याचा धोका असतो हे समजून घेतलं पाहिजे. वारंवार त्याच कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास संपूर्ण गुंतवणूक पोर्टफोलिओ एका कंपनीवर किंवा क्षेत्रावर अधिक अवलंबून होते. त्यामुळे व्हेरिएशन कमी होऊन तोट्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर दुसरी संधी गमावण्याचा धोकाही असतो. सरासरी कामगिरी करणाऱ्या शेअरमध्ये अतिरिक्त पैसा गुंतवल्यास तो पैसा इतर संभाव्य चांगली कमी करणाऱ्या शेअर्ससाठी उपलब्ध राहत नाही. यालाच संधी खर्च झाली असं म्हणतात.
भावनिक निर्णयाचा धोकाही असतो. 'शेअर खूप घसरला आहे, त्यामुळे आता तो नक्कीच वर जाईल' असा विचार करून खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. विशेषतः अत्यंत अस्थिर शेअर्समध्ये हा धोका अधिक असतो, हे समजून घेणं महत्त्वाचं असून याबद्दल जाणकारांचा सल्ला घ्यावा. तसेच कंपनीचा व्यवसाय सतत कमजोर होत असेल आणि शेअरची घसरण सुरूच राहिली, तर अधिक शेअर्स खरेदी केल्याने गुंतवलेली रक्कम वाढत जाते. त्यामुळे संभाव्य तोटाही वाढू शकतो, याकडेही लक्ष ठेवणं अधिक सोयीस्कर ठरतं.