Moringa Stick Soup Recipe : शेवग्याच्या शेंगा ही एक अशी भाजी आहे जी लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आपल्या डायटमध्ये सामील केली पाहिजे. तसेच हिवाळ्यात चहा, कॉफीपेक्षा गरमागरम शेवग्याच्या शेंगांचं सूप बेस्ट ठरतं. जे आरोग्यासाठी चांगलं आहेच मात्र त्यासोबतच टेस्टी सुद्धा आहे. शेवग्याच्या शेंगांचं सूप प्यायल्याने आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते सोबतच व्हिटॅमिन सीचा हा चांगला स्रोत असून यामुळे केस आणि त्वचेला सुद्धा फायदे मिळतात.
सूप तयार करण्यासाठी साहित्य :
दोन शेवग्याच्या शेंगा
2 कप टोमॅटो
1 इंच आकाराचं आलं
2 चमचे पिवळी मूग डाळ
2 कप पाणी
चवीनुसार मीठ
सूपला फोडणी देण्यासाठी साहित्य :
1½ तूप
छोटा चमचा जिरं
1 लहान चमचा काळी मिरी पावडर
½ चमचा कोथिंबीर
सूप बनवण्याची कृती :
भांड्यात मध्यम कापलेल्या शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, आले, मीठ आणि मूग डाळ घाला, त्यानंतर गरजेनुसार पुरेसे पाणी ओता. हे सर्व मिश्रण प्रेशर कुकरमध्ये ठेवा आणि कुकरचे झाकण नीट बंद करा. कुकरच्या ३ शिट्ट्या होईपर्यंत थांबा. प्रेशर कुकरचे झाकण उघडा आणि सर्व घटक नीट शिजले आहेत का ते तपासा. त्यानंतर, शिजवलेले मिश्रण थोडे थंड होऊ द्या. सर्व काही थंड झाल्यावर, ब्लेंडरचा वापर करून ते पूर्णपणे एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या. सर्व काही नीट वाटून झाल्यावर, मिश्रणाला गाळणीने गाळून घ्या, जेणेकरून शेवग्याच्या शेंगांमधील तंतू वेगळे होतील. फोडणी देण्यासाठी, एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करा आणि त्यात जिरे टाका. जिरे तडतडू लागल्यावर ही फोडणी सूपमध्ये घाला. आता यात काळी मिरी पूड घाला आणि सूपला उकळी येऊ द्या. काही वेळातच शेवग्याच्या शेंगांचे सूप तयार होईल. त्यावरून चिरलेली ताजी कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.