मुंबईतील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या जुहू परिसरातील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला कारचालक वाहतूक पोलिसांच्या विनंतीनंतरही गाडी थांबव नसून त्यांच्या अंगावर चढवताना दिसतंय. महिलाने पोलिसांना न जुमानता कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पोलीस कार रस्त्याच्या बाजूला थांबवण्यासाठी वारंवार सांगत होता. तरीही महिला अरेरावी करत कार पुढे नेण्याचा प्रयत्न करत होती. ही सर्व घटना व्हिडीओमध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने जुहू परिसरात भरधाव वेगात कार असतान स्कूटर, दुचाकी आणि कारला धडक दिली आहे. अपघातानंतर कार न थांबवता महिला पुढे जात होती. तेवढ्यात वाहतूक पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्या महिलेने पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार घालण्याचाही प्रयत्न केला. एवढंच नाहीतर व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला पोलीस कर्मचाऱ्याने कारचा मागील दरवाजा उघडून महिलेला वाहन थांबवण्यास सांगितले. मात्र, कारचालक महिलेने स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून पोलिसांवरच उलट आरोप करण्यास सुरुवात केल्याचा दावा करण्यात आला आहे.
तर मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे की, ही घटना शुक्रवारी (30 ऑक्टोबर 2026) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. जुहू परिसरातील संगीत भारती चौक सिग्नलवर हा प्रकार घडला. या महिलेने सिग्नलवर असलेल्या गाडींना मागून धडक दिली. या महिला चालकाच्या कारचा नंबर MH02GJ8704 आहे. तर या महिलेने ज्या वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली त्यांचं नाव कॉन्स्टेबल प्रशांत हाके असं आहे. दरम्यान या महिलेविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.