राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा सुरु असतानाच, आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदारानी शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. दरम्यान या भेटीमागे आमदारांची नाराजी असल्याचा मोठा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे. सुनेत्रा पवारांचा जो पक्ष आहे त्यातील 20 ते 22 आमदार कधीही बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत असा गौप्यस्फोटच त्यांनी केली आहे. ते स्वगृही परतणार असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे. तसंच अमित शाहांनी निर्माण केलेला हा पक्ष पुन्हा फुटेल असंही म्हटलं आहे.
"मी याआधीही सांगितलं होतं की, सुनेत्रा पवारांचा म्हणजेच अमित शाहांचा पक्ष आहे त्यातील 20 ते 22 आमदार कधीही बाहेर पडतील. ते बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत. ते शरद पवारांना ते फक्त गप्पा मारण्यासाठी भेटत नाहीयेत. अजित पवारांचं नेतृत्व राहिलेलं नाही. एकाप्रकारे त्यांना गुलामी करावी लागत आहे, स्वाभिमान गहाण ठेवावा लागत आहे. अशा स्थितीत एक तर ते स्वगृही परततील, आणि त्याला विलीनीकरण म्हणत नाहीत. किंवा मग ते निवडणुकीच्या आधी एखाद दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील. पण अमित शाहांचा हा पक्ष पुन्हा एकदा फुटेल," असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात आम्हाला सांगितल्याशिवाय निर्णय होणार नाही असं सांगितलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "ते सुनेत्रा पवारांना तसं सांगू शकतात. शरद पवारांसंदर्भात ही भूमिका नसेल. सुनेत्रा पवारांचा पक्ष हे भाजपाचं, अमित शाहांचं अंगवस्त्र आहे. त्यासंदर्भात ते निर्णय घेऊ शकतात. किंवा एकनाथ शिंदेंचा जो पक्ष आहे ते भाजपाचं अंगवस्त्र आहे. त्याबाबतीत ते निर्णय घेऊ शकतील. पण पण मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेतृत्वात असून त्याबतीत ते निर्णय घेऊ शकत नाहीत".
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदारानी शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. आज बुधवारी भेटीसाठी वेळ मागिल्याची सूत्रांची माहिती आहे. नुकतंच पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती. सध्या शरद पवार मुंबईतच असून पुढील काही दिवस सिल्व्हर ओक निवासस्थानी आराम करणार असल्याची पवार कुटुंबीयांची माहिती आहे.