ठाण्यातील ठाकरे गटाचे शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. हत्येचं नेमकं कारण काय आहे याचा उलगडा आता स्वत: आरोपीने केला आहे. आरोपीने कोर्टात यासंदर्भात कबुली दिली आहे. एका नगरसेवकाच्या वादातून ही हत्या झाल्याचं आरोपीने कबूल केल्याचं वकिलांनी म्हटलं आहे. कबुली जबाबात कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, तर फक्त नगरसेवकाच्या वादाचा उल्लेख आहे.
आज संतोष कनोजिया आणि अमित सिंह यांना कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात आले होते. गेल्या सोमवारी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज कोर्टाने त्यात आणखी चार दिवसांची वाढ केली आहे, आता त्यांची पोलीस कोठडी 22 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. युक्तिवादादरम्यान UP STF (स्पेशल टास्क फोर्स) समोर आरोपीने दिलेली कबुली जबाबाची कॉपी आम्ही कोर्टात सादर केल्याचं वकील समीर हाटले यांनी सांगितलं.
त्या कबुली जबाबाच्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, ही हत्या एका नगरसेवकाच्या वादावरून करण्यात आली आहे. हे सोशल मीडियावर पण फिरत आहे. तीच गोष्ट गृहीत धरून कोर्टाने हा तपास पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टासमोर आता एक नवीन कागदपत्र आलं आहे. या प्रकरणी प्रयागराज कोर्टात फाईल केलेले रिमांड रिपोर्ट देखील आम्ही कोर्टात सादर करणार आहोत असं त्यांनी सांगितलं.
त्या कबुली जबाबात कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, फक्त नगरसेवकाच्या वादाचा उल्लेख आहे. पोलिसांनी कोर्टासमोर काही अत्यंत गोपनीय कागदपत्रं सादर केली आहेत, जे फक्त कोर्ट आणि IO तपास अधिकारी यांनीच पाहिले आहेत. त्यांचा रिमांड रिपोर्टमध्ये उल्लेख नाही. महत्त्वाचे पुरावे थेट कोर्टालाच दाखवण्यात आले आहेत, पब्लिक किंवा आम्हालाही दाखवले गेले नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. जवळपास पावणेसात तास त्यांची चौकशी करण्यात आली खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात ही चौकशी सुरु होती. चौकशीदरम्यान आरोपी संतोष कनोजिया आणि अमित सिंग यांनाही समोरासमोर बसवण्यात आलं होते.