महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे. असे असतानाच आता शिवसेनेच्या दोन गटांच्या संभाव्य एकत्रीकरणावरही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. अनेक नेते दोन्ही शिवसेना एकत्र येणार, अशी विधाने करत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. काय म्हणाले ओमराजे? सविस्तर जाणून घेऊया.
ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही पक्ष एकत्र आले, तर त्याचे स्वागतच करू, असे स्पष्ट मत ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले. सामान्य नागरिक आणि पक्षातील कार्यकर्त्यांचीही अशीच भावना असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या विधानामुळे शिवसेनेच्या पुनर्मिलनाच्या चर्चेला पुन्हा वेग आलाय.
दोन्ही शिवसेना गटांचे नेतृत्व सध्या स्वतंत्र असून एकत्रीकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित पक्षप्रमुखांचाच आहे. काय भूमिका घ्यायची, हे संबंधित नेते ठरवतील असे ते म्हणाले.
ओमराजे निंबाळकर यांनी काही महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका झाली. ठाकरेंच्या इतके जवळचे असूनही असा निर्णय का घेतला? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या निर्णयावरही त्यांनी भाष्य केले. कोणताही माणूस आनंदाने पक्ष बदलत नाही. त्यामागे काही परिस्थिती निर्माण झालेली असते, असे ते म्हणाले. आपल्या निर्णयामागेही काही घडामोडी होत्या, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षातील परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली.
धाराशिवमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पराभवाचाही निंबाळकर यांनी उल्लेख केला. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नव्हते. एकही नगरपालिका किंवा पंचायत समिती जिंकता आली नाही, इतके आमचे काम वाईट होते का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनतेने आपल्याला आरसा दाखवायला सुरुवात केली होती, असेही त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही यापूर्वी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यास ती खरी दिवाळी ठरेल, असे विधान केले होते. त्यानंतर आता ओमराजे निंबाळकर यांनीही दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. ठाकरेंच्या पक्षाकडून नसले तरी शिंदेंच्या गोटातून तरी अशी विधाने येऊ लागली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.