Hardik Pandya Punjab Kings : आयपीएल 2027 पूर्वी ज्या ट्रेडची चर्चा होती त्या ट्रेडवर बुधवार 11 नोव्हेंबर रोजी अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहिलेला हार्दिक पांड्या याला पंजाब किंग्सकडे ट्रेड करण्यात आलं असून त्याबदल्यात पंजाब किंग्सचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झालेला आहे. हार्दिक पांड्या 18 कोटींना पंजाब किंग्समध्ये सामील झाला तर अर्शदीप सिंह सुद्धा 18 कोटींच्या करारावर मुंबईमध्ये सामील झाला होता. हार्दिक पांड्या जेव्हा 2024 मध्ये गुजरात टायटन्समधून मुंबई संघात ट्रेड झाला तेव्हा त्याला लागलीच कर्णधारपद देण्यात आलं. त्यानंतर तीन वर्ष तो मुंबईचा कर्णधार होता. मात्र त्याच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. आयपीएल 2027 पूर्वी हार्दिक जेव्हा इतर संघांमध्ये जाण्याची संधी शोधात होता तेव्हा तिकडे सुद्धा त्याला कर्णधारपद मिळावे अशी त्याची मागणी असल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलेलं. मात्र मागच्या दोन वर्षात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्स चांगली कामगिरी करत असताना आता हार्दिक पंजाब किंग्समध्ये सामील झाल्यावर संघाचं नेतृत्व नक्की कोण करणार याबाबत प्रश्न विचारला जात होता. मात्र पंजाब किंग्सने स्वतः आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट करून सर्व शंका मिटवल्या आहेत.
पंजाब किंग्सच्या पोस्टमध्ये काय?
पंजाब किंग्सने हार्दिक पांड्याचं स्वागत करत असताना त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये हार्दिकचा फोटो शेअर करण्यात आला होता त्याखाली कॅप्शन देण्यात आले की, 'सत श्री अकाल. माझा कर्णधार श्रेयस, माझा कोच रिकी, माझा संघ संपूर्ण पंजाब. मी तुमच्या पाठशीही उभा आहे'. यात स्पष्टपणे श्रेयस अय्यर हा कर्णधार असल्याचं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी आयपीएल 2027 सीजनमध्ये हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून नाही तर खेळाडू म्हणून पंजाब किंग्सचा भाग असणार हे स्पष्ट झालं आहे.
हार्दिक पांड्याला कोट्यवधींचा फायदा :
अर्शदीप सिंह याला मागील ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने 18 कोटींच्या करारावरच घेतलं होतं. यंदा मुंबई इंडियन्सकडे ट्रेड होताना तो त्याच प्राईज मनीवर ट्रेड झालेला आहे. मात्र हार्दिक पांड्याला आयपीएल 2026 मध्ये 16.35 कोटी रुपयांच्या मानधनावर रिटेन करण्यात आलेलं. तर आता पंजाब किंग्सकडे ट्रेड होताना हार्दिक पांड्या 18 कोटी रुपयांच्या मानधनावर पंजाब किंग्समध्ये सामील झालेला आहे.