IPL 2027 Team Retention : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी20 लीगपैकी एक आहे. बीसीसीआयने सर्व फ्रेंचायझींना 17 नोव्हेंबर पर्यंत त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर करण्यास सांगितलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियातील काही खेळाडूंनी स्वतःला रिटेन करण्यासाठी आपल्या संघाकडे जास्त पैसे मागितले आहेत. ही रक्कम इतकी जास्त आहे की फ्रेंचायझींना खेळाडूंना रिटेन करणं कठीण आहे. रिपोर्ट्सनुसार काही भारतीय खेळाडूंनी संघात कायम राहण्यासाठी आपली किंमत 40 कोटी रुपयांपर्यंत निश्चित केली आहे.
संघात कायम राहण्यासाठी 40 कोटी रुपये :
क्रिकेबझच्या रिपोर्ट्सनुसार आयपीएलमधील काही टॉप खेळाडूंनी आपल्याला संघात कायम ठेवण्यासाठी रिटेन्शन फी म्हणून तब्बल 40 कोटी रुपयांची मागणी केली आहे. सांगितलं जातंय की काही खेळाडूंनी त्यांच्या आयपीएल फ्रेंचायझींना सांगितलं आहे की ते संघात तेव्हाच कायम राहतील जेव्हा त्यांना 40 कोटी रुपयांपर्यंत रिटेन्शन फी दिली जाईल. भारतीय संघातील जवळपास सर्व संघ हे अशाच प्रकारची डिमांड करू शकतात. अन्यथा ऑक्शनमध्ये सहभाग घेऊन त्यांना मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात.
पंत आणि श्रेयसवर लागलेली मोठी बोली :
खेळाडू रिटेन्शनमधून बाहेर पडून ऑक्शनमध्ये येण्याची तयारी दाखवण्यामागे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर सारखे खेळाडू आहेत. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे दोघेही आयपीएल 2025 पूर्वी झालेल्या ऑक्शनमध्ये उतरले होते. यावेळी श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांची बोली मिळाली, तर ऋषभ पंतला 27 कोटी रुपयांची बोली लागली होती. विशेष म्हणजे 2028 च्या आयपीएल सिजनपूर्वी आणखी एक मेगा ऑक्शन होणार आहे. ज्यावेळी संघांचे ऑक्शनसाठीचे बजेट 150 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते. मात्र तोपर्यंत संघांना खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी रिटेन्शन फी म्हणून 40 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागू शकते. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर फ्रँचायझींसमोर कठीण आव्हान उभे राहू शकते.