IPL 2027 Trade Deal : मागील अनेक दिवसांपासून आयपीएल 2027 पूर्वी ज्या ट्रेड डीलची जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात रंगली होती. ती ट्रेड डील आता अखेर पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन फ्रेंचायझीमध्ये झाली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला पंजाब किंग्सकडे ट्रेड डीलद्वारे पाठवण्यात आलं असून पंजाब किंग्सने त्या बदल्यात गोलंदाज अर्शदीप सिंहला मुंबई इंडियन्सला ट्रेड केलं आहे. आयपीएलने स्वतः याबाबत अधिकृत परिपत्रक जाहीर करून घोषणा केली आहे.
हार्दिक पांड्याला झाला कोट्यवधींचा फायदा :
हार्दिक पांड्या हा 2015 पासून मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र त्यानंतर 2022 मध्ये तो गुजरात टायटन्समध्ये गेला. तेथे त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. मात्र त्यानंतर आयपीएल 2024 मध्ये तो पुन्हा ट्रेड होऊन मुंबई इंडियन्समध्ये आला. त्याच्या येण्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिकला मुंबई संघाचा नवा कर्णधार करण्यात आले. मात्र त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी चांगली ठरली नाही. आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळलेल्या शेवटच्या सामन्यात हार्दिकने मुंबई इंडियन्सची जर्सी काढून फेकून टाकलेली दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली. त्यानंतरच हार्दिक पांड्या हा आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्स सोडणार अशी चर्चा होती. मागील काही दिवसांपासून हार्दिकच्या ट्रेड डीलबाबत मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स यांच्यात ट्रेडबाबत चर्चा होती. अखेर हे डील आता फायनल झालं असून हार्दिक हा 18 कोटी रुपयांच्या मानधनावर पंजाब किंग्समध्ये सामील झालेला आहे. जे त्याच्या सध्याच्या 16.35 कोटी रुपयांच्या मानधनापेक्षा जास्त आहे.
India's highest wicket-taker in men’s T20Is is now a Mumbaikar! Arshdeep Singh AALA RE! https://t.co/1N9OiZvbvv
— Mumbai Indians (mipaltan) November 11, 2026
अर्शदीप सिंहची मुंबई इंडियन्समध्ये एंट्री :
27 वर्षांचा गोलंदाज अर्शदीप सिंह याला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. हार्दिकच्या बदल्यात मुंबईने पंजाब किंग्सचा महागडा
गोलंदाज आपल्याकडे घेतला आहे. अर्शदीप 18 कोटी रुपयांच्या आपल्या सध्याच्या मानधनावर मुंबई इंडियन्समध्ये सामील झालाय. अर्शदीपच्या येण्याने मुंबईचा गोलंदाजी अटॅक आणखीन मजबूत होईल. 17 नोव्हेंबर पर्यंत बीसीसीआयने सर्व फ्रेंचायझीला त्यांच्या रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे.