सूर्यकुमार यादव KKR मध्ये जाण्याची चर्चा असतानाच समोर आला 'हा' Video, अखेर शिक्कामोर्तब
Suryakumar Yadav : भारताचा माजी कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा आयपीएल 2027पूर्वी ट्रेड होणार अशी चर्चा रंगली होती. लखनऊ सुपर जाएंट्स आणि केकेआर हे दोन संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक आहेत अशी माहिती होती. मात्र सूर्यकुमार यादवने अखेर एक व्हिडीओ शेअर करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Suryakumar Yadav : इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगपैकी एक आहे. आयपीएल 2027 हा स्पर्धेचा 20 वा सीजन असणार आहे. या सीजनसाठी डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन पार पडेल. तर 17 नोव्हेंबर पर्यंत सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. त्यापूर्वी स्टार खेळाडूंच्या ट्रेडींग संदर्भात अनेक माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा कोलकाता नाईट रायडर्समध्ये ट्रेंड होऊन जाणार अशी चर्चा रंगलेली. सूर्यकुमार यादवला मुंबई संघात नेतृत्वाची संधी दिली जात नाहीये, त्यामुळे तो केकेआरमध्ये जाण्यासाठी उत्सुक असून तेथे अजिंक्य रहाणेनंतर त्याला नेतृत्वाची संधी दिली जाऊ शकते. मात्र या सर्व चर्चांना मंगळवारी एका व्हिडीओमुळे पूर्णविराम लागला आहे.
सूर्यकुमार KKR मध्ये जाण्याच्या रंगल्या होत्या चर्चा :
भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव हा मागील अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. स्टार फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारला टीम इंडियाचा टी20 कर्णधार म्हणून संधी मिळाली. त्याच्या नेतृत्वात भारताने 2026 चा टी20 वर्ल्ड कप सुद्धा जिंकला. मात्र अनुभवी खेळाडू असताना सुद्धा सूर्यकुमार यादवला रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची संधी देण्यात आली नाही. त्याऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आले. तेव्हा अनेक वर्ष मुंबई इंडियन्सकडून खेळल्यावर कर्णधारपदासाठी सूर्यकुमार हा इतर फ्रेंचायझींच्या संपर्कात असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत होती. सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्समध्ये येण्याच्या पूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर कोलकाता नाईट रायडर्स संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. तेव्हा सूर्यकुमार यादवला केकेआर ट्रेड करून आपल्या संघात घेईल असं बोललं जात होतं. तसेच ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सशी जोडल्यावर लखनऊ सुपर जाएंट्समधील कर्णधारपद सुद्धा रिकामे होते. अशावेळी लखनऊ फ्रेंचायझी सूर्यकुमार यादवला ट्रेड करून घेण्यासाठी उत्सुक दिसत होती. आता सूर्यकुमार यादवनेच मंगळवारी एक व्हिडीओ शेअर केला असून या सर्व शंकांना पूर्णविराम लावला आहे.
हेही वाचा : हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये जाणार? बदल्यात मुंबई इंडियन्सला मिळणार दोन स्टार खेळाडू
सूर्यकुमार यादवने शेअर केला व्हिडीओ :
सूर्यकुमार यादवने त्याच्या ट्रेडच्या चर्चे दरम्यान एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये प्रॅक्टिस करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्याने Back in the groove असं कॅप्शन दिलं असून मुंबई इंडियन्स सोबत व्हिडीओ कोलॅब सुद्धा केला आहे. फ्रेंचायझींसाठी 17 नोव्हेंबर रोजी रिटेंशन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर करण्याची ही शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी सूर्यकुमारने शेअर केलेल्या या व्हिडीओवरून तो मुंबई इंडियन्स सोडून जात नाहीये हे स्पष्ट होतंय.