काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव' (Belonging: A Journey of Love) या आत्मचरित्राचं काल प्रकाशन झालं. या पुस्तकामध्ये यापूर्वी कधीही समोर न आलेल्या अनेक गोष्टीबाबत सोनिया गांधींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. पडद्यामागील अनेक किस्से, गोष्टी आणि घटनांवर सोनिया गांधींनी प्रकाश टाकला आहे. पुस्तकात एका ठिकाणी त्यांनी कशाप्रकारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पदावरुन हटवून स्वत:ला पंतप्रधान करण्यासाठी एक ज्येष्ठ नेता प्रयत्न करत होता याबद्दल भाष्य केलं आहे. यावर या नेत्याच्या मुलीनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
हा नेता कोण?
मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळादरम्यान ज्यावेळेस सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या त्यावेळी त्यांच्याकडे पूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान होण्याच्या इच्छा व्यक्त केली होती. सोनिया गांधींनी हा खुलासा प्रणव मुखर्जींसोबत झालेल्या एका संवादाचा संदर्भ देत केला आहे.
नक्की काय सल्ला दिला होता या नेत्याने?
सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, "2010 मध्ये एका संभाषणादरम्यान प्रणव मुखर्जी यांनी त्यांना "आता शीर्ष स्तरावर (नेतृत्वात) बदल करण्याची वेळ आली आहे" असे सूचक विधान केलं होतं. प्रणव मुखर्जींच्या विधानाने मला धक्काच बसला. हे विधान आश्चर्यचकित करणारं होतं." सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जींनी 'टॉप लेव्हलमध्ये बदल करण्याची गरज' या विधानाचा प्रणव मुखर्जी यांची पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा होती असा अर्थ आपल्या पुस्तकात लावला आहे.
नंतर झाले राष्ट्रपती
याच पुस्तकामध्ये पुस्तकात असाही उल्लेख आहे की, तत्कालीन वित्तमंत्री पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. मुखर्जी यांचे हे बोलणे ऐकून सोनिया गांधी यांनी सहजपणे संभाषणाचा विषय बदलला होता, असंही पुस्तकात म्हटलं आहे. यानंतर 2012 मध्ये काँग्रेसने त्यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनवले होते. 2012 ते 2017 या काळात भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जी सर्वोच्च पदावर विराजमान होते.
नेत्याच्या मुलीने या खुलाश्यावरुन सोनिया गांधींना विचारला सवाल
सोनिया गांधींनी आपल्या पुस्तकातून केलेल्या या खुलाशावर प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आक्षेप घेतला आहे. "एखाद्या योग्य आणि अनुभवी नेत्याने पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे हा गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा आहे का? यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?" असा सवाल शर्मिठा मुखर्जींनी केला आहे.